दुर्गा भागवत हे नाव उच्चारता क्षणी एक अभ्यासू, करारी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या नीतिमान आचरणाने त्यांनी साहित्यक्षेत्रावर स्वतःची अशी वेगळी नाममुद्रा उमटवली. महत्त्वाचं म्हणजे, जवळजवळ संपूर्ण विसावं शतक अनुभवणाऱ्या दुर्गाबाई सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय प्रश्नांसंबंधी भूमिका घेत राहिल्या आणि आपल्या लेखनातून सतत व्यक्त होत राहिल्या. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी माणसाने भूमिका घेतली पाहिजे, विशेषतः कलावंत- साहित्यिकांना आपली भूमिका असली पाहिजे आणि वेळप्रसंगी ती त्यांनी ठासून मांडली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असायचं. या भूमिकेतूनच दुर्गाबाईंनी आयुष्यभर विपुल लेखन केलं. ललित, वैचारिक, अनुवादित, लोकसाहित्यपर... असे त्यांच्या लेखनाचे विविध कप्पे होते. लेखनासाठी त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, तसंच त्या लेखनासाठी कितीही संशोधन करण्याची त्यांची तयारी असायची... त्यातूनच त्यांची असंख्य इंग्रजी- मराठी पुस्तकं निर्माण झाली आणि प्रकाशितही झाली. तरीही दुर्गाबाईंच्या लेखनाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की, त्यांचं बरचसं लेखन आजवर विखुरलेल्या स्वरुपात पडूनच राहिलं होतं. ते कुठेकुठे प्रकाशित झालेलं होतं, परंतु ते एकत्र संकलित झालेलं नव्हतं. मात्र दुर्गाबाईंच्या निधनाला गुरुवारी १३ वर्षं पूर्ण झालेली असताना, उद्या, शनिवारी त्यांच्या चार पुस्तकांचं एकत्र प्रकाशन होत आहे. 'शब्द पब्लिकेशन'तर्फे प्रकाशित होणाऱ्या आणि मीना वैशंपायन यांनी संकलित व संपादित केलेल्या या पुस्तकांची नावंही 'संस्कृतिसंचित', 'विचारसंचित', 'भावसंचित' आणि 'दुर्गुआजीच्या गोष्टी' अशी खास आहेत. 'संस्कृतिसंचित' या पुस्तकात विविध ज्ञानशाखांच्या आधारे दुर्गाबाईंनी घेतलेला एकप्रकारे संस्कृतीचा मागोवा आहे. 'विचारसंचित' पुस्तकात त्यांचे विविध सामाजिक-राजकीय विषयांवरील वैचारिक लेख एकत्रित करण्यात आलेत. 'भावसंचित' मध्ये दुर्गाबाईंचे ललित लेख संकलित करण्यात आलेत. तर 'दुर्गुआजीच्या गोष्टी' मध्ये दुर्गाबाईंनी आजीच्या भूमिकेतून सांगितलेल्या बालकथा आहेत. हे सारं लेखन दुर्गाबाईंनी निमित्तानिमित्ताने केलेलं होतं. मात्र निमित्ताने लेखन करतानाही, त्यांनी आपली लेखकीय बांधिलकी आणि भूमिका कायमच महत्त्वाची मानली. त्यामुळेच नव्याने प्रकाशित होणारी ही चार पुस्तकं म्हणजेही दुर्गाबाईंनी आयुष्यभर पुरस्कार केलेल्या व्यक्ती आणि कृतिस्वातंत्र्याचीच निदर्शक आहेत. म्हणजेच, त्यांनी आयुष्यभर वेगवेगळ्या प्रश्नांवर घेतलेल्या 'भूमिके'चीच द्योतक आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट