महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आज, शुक्रवारी डॉ. गेल ऑम्वेट यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त डॉ. ऑम्वेट यांच्या कार्याचा परिचय...
डॉ. गेल ऑम्वेट यांचा जन्म दोन ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनीअॅपोलिस या शहरात झाला. त्यांनी एम. ए. आणि समाजशास्त्र या विषयात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी बर्कले येथून पीएच. डी. घेऊनशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या विद्यापीठीय अभ्यासातच बंदिस्त न राहता भारतात येऊन त्यांनी समाजशास्त्रीय अध्ययनाला सुरुवात केली. भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील समाजपरिवर्तक चळवळींशी त्यांचा अतूट संबंध राहिला. श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्यासमवेत मौलिक स्वरूपाचे कार्य केले. १९७६ साली त्या डॉ. पाटणकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि शलाका पाटणकर झाल्या. त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर हे महाराष्ट्रातील धरणग्रस्त चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते आहेत. डॉ. गेल यांना १९८३मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. त्या कासेगाव (सांगली) येथे राहतात.
'वासाहतिक समाजातिल सांस्कृतिक बंड' या विषयासंदर्भातील प्रबंध १९७३ साली कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर केल्यावर त्यांना त्याकरिता डॉक्टरेटची पदवी मिळाली. या प्रबंधामुळे व त्यावरील पुस्तकामुळे म. जोतिराव फुले यांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचाराला जगभर मान्यता मिळाली. डॉ. गेल ऑम्वेट या वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंडाची जातलक्ष्यी अन्वीक्षा कसादर करणाऱ्या, तसेच सत्यशोधक चळवळीच्या जातवर्गीय व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा वेध घेणाऱ्या भारतीय स्तरावरील पहिल्या विदूषी म्हणून ओळखू जाऊ लागल्या. त्यांच्या लेखनाने वर्गवादात बंदिस्त असलेल्या सामाजिक- सांस्कृतिक वास्तवाकडे बघण्याचा बहुप्रवाही दृष्टिकोन पुढे आला. महाराष्ट्रातील समाजसुधारणांबाबतच्या परंपरांचा, तिच्या अस्मितेचा, तिच्या धडपडीचा, तिच्या जाणिवांचा, तिच्या लढ्यांचा, तिच्या उणीवांचा एक उत्कृष्ट आलेख त्यांनी संशोधन प्रबंधाद्वारे मांडला. याच काळात भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेशी त्यांचे नाते जुळले. त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कृतिशील विचारवंत आहेत. त्यांना देश- विदेशातील अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
दलित, जातिअंत चळवळी, यांचबरोबर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींच्या संदर्भात केवळ त्या अभ्यासक म्हणून कार्यरत नाहीत, तर प्रत्यक्ष आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण महिला, कष्टकरी यांच्याशी निगडित असलेल्या मागण्यांसदर्भात क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर, तसेच चळवळीतील सहकारी व पती डॉ. भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्या रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पाहत नाहीत. म्हणूनच त्या श्रमिक मुक्ती दलाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत.
अनेक पुस्तके व ग्रंथ त्यांनी लिहिले असून, त्यातील दलित व्हिजन (१९७५), वुई शाल स्मॅश धिस प्रिझन : इंडियन वुमन इन स्ट्रगल (१९७९), व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन : न्यू थिअरीज अँड न्यू मूव्हमेंट्स इन इंडिया (१९९१), दलित अँड डेमोक्रॅडटिक रिव्हॉल्यूशन (१९९४), बुद्धिझम इन इंडिया (२००३) ही पुस्तके गाजली आहेत. त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या सहकार्याने संत तुकाराम यांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारा ग्रंथ 'साँग्ज ऑफ तुकोबा' या नावाने लिहिला आहे. डॉ. गेल ऑम्वेट यांचा 'कल्चरल रिव्होल्ट इन ए कलोनियल सोसायटी : द नॉन ब्राह्मिन मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया (१८७३-१९३०) या विषयावरील ग्रंथ चांगलाच गाजला. या ग्रंथातून त्यांनी भारतातील ब्राह्मणेतर आणि दलित चळवळीच्या नेतृत्वाखालील वर्गीय आंदोलनाच्या मर्यादा आणि यशापयशाची केलेली मीमांसा उद्बोधक आहे.
श्रमिक मुक्ती दल, स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ, शेतकरी महिला आघाडी या संघटनांतून त्या सक्रियपणे काम करत आहेत आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांनी वर्ग, जात, लिंगभाव, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण, शेती या विषयांवर अनेक वैचारिक लेख लिहिले असून, विविध संशोधन ग्रंथांमध्ये ते प्रसिद्धही झाले आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सोशल चेंज अँड डेव्हलपमेंटच्या डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यासनाच्या त्या चेअरपर्सन आहेत. पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात त्या अधिव्याख्यात्या होत्या. कोपनहेगन (अमेरिका) येथील 'नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज'च्या त्या एशियन गेस्ट प्रोफेसर म्हणून त्या काम पाहतात. क्रांतिवीर ट्रस्टच्या त्या संशोधन संचालक आहेत. एफएओ, यूनडीपी, ऑक्सफॅम नोव्हिब आणि इतर संस्थांवरही त्या सल्लागार म्हणन कार्यरत आहेत.
त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय समकालीन महाराष्ट्रातील विचारविश्वाची ओळख व पूर्तता होऊ शकत नाही. वैचारिक योगदान व जातवर्गविरोधी प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहिलेली जागतिक स्तरावरील कार्यकर्ती विदूषी या शब्दात त्यांचा गौरव करणे उचित ठरेल. त्यांचा गौरव म्हणजे श्रमिकांसाठी, शोषित वंचित स्त्रियांसाठी कृतिशील राहून केलेल्या कार्याचा गौरव होय. तसेच प्रबोधन क्षेत्रातील वैचारिक योगदानाचा गौरव होय.
(लेखक प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट