आपल्याकडे मेद म्हणजे, हल्लीच्या भाषेत फॅट हा शब्दही उच्चारावासा वाटत नाही. पण, सर्वच फॅट वाईट नसतात. काही फॅट चांगले असतात आणि ते आपल्या आरोग्याचा अविभाज्य भाग असतात. दिवसभऱात शरीरात मेदयुक्त पदार्थ जातात का याची बहुतेकांना जाणीवच नसते. आपले शरीर फार कार्यक्षम मशीन आहे. शरीर आपल्या आहारातून भरपूर मेद घेऊन त्याची निर्मिती करते. पण, तरीही 'ओमेगा ३' आणि 'ओमेगा-६' हे आवश्यक मेद शरीर तयार करू शकत नाही. त्याचा पुरेसा पुरवठा आपल्या खाद्यपदार्थातून होत असतो. कारण फॅटी अॅसिड (मेदाम्ल) शरीरासाठी आवश्यक असतात. कारण त्याच्या कमतरतेमुळे तणाव, प्रतिकारशक्ती कमी होणे, यकृत व किडनी यांसारखे अवयव निकामी होणे, असे गंभीर आजार होऊ शकतात.
'ओमेगा ३' हे आपल्या शरीराचे कार्य सुधारण्यासाठी व मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्यात तीन प्रकारचे फॅट असतात. अल्फा लिनोलेनिक अॅसिड, इकोसॅपेन्टाइनॉइक अॅसिड व डोकोसॅहेइक्सानॉइक अॅसिड असे प्रकार आहेत. त्यातील पहिले वगळता उर्वरीत दोन अॅसिड माशांमधून तर पहिले अॅसिड डाळीमधून मिळते.
'ओमेगा ३' हृदय, मेंदू व डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ते रक्ताच्या गाठींसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करते, असे वैद्यकीय संशोधनातून आढळले आहे. हे अॅसिड रक्ताभिसरण व ऑक्सिजन पुरवठा वाढवते. 'ओमेगा ३' हे हृदयासाठीही लाभदायक आहे. हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता हे अॅसिड कमी करते. अमेरिकन हार्ट असोसिएशन तर निरोगी हृदयासाठी 'ओमेगा ३' नियमित घेण्याचा सल्ला देतात. या मेदामुळे बालकांची दृष्टीही चांगली होते.
'ओमेगा ३'चे उत्तम स्रोत म्हणजे मासे, माशांपासून तयार केलेले तेल, कॉर्ड लिव्हर ऑईल हे आहे. शाकाहारी मंडळींना हिरव्या पालेभाज्या, अळशीची बी, सोयाबीन, राजमा, मटकी, ब्लॅक बीन्स, अक्रोड, पांढऱ्या मोहरीचे तेल यातून हे अॅसिड मिळते. भारतात काही टेबल स्प्रेडमध्ये (पावावर लावायचा पदार्थ) भाजीपाल्यांमधून काढलेल्या 'ओमेगा ३'चा वापर करतात. त्यामुळे यापुढे कोणताही आहार घेताना त्यातून शरीराला 'ओमेगा ३' मिळेल याची दक्षता घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट