एकोणीसशे बंदिशी शिकून, साथीदारांची जमवाजमव करून त्या सर्व ध्वनिमुद्रित करून, त्यावर संस्कार करून त्यांच्या एमपीथ्री, सीडीज तयार करणे, सर्व बंदिशी शुद्ध करून मुद्रित स्वरूपात उपलब्ध करणे असे काम पंडित इंदुधर निरोडी यांनी कष्टपूर्वक केले आहे. त्याबद्दल मुंबईकर असलेल्या पं. इंदुधर निरोडी यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईत कर्नाटक संघ आणि म्युझिक फोरम या संस्थांच्यावतीने दोन समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी...
विष्णु नारायण भातखंडे यांनी हिंदुस्थानी संगीतासाठी केलेल्या कामासाठी अद्भुत हाच शब्द योग्य आहे. त्यांनी अनेक गुरूंकडून शेकडो बंदिशी मिळवल्या. त्या ग्रंथित करण्यासाठी योग्य अशी नोटेशनपद्धती तयार केली. गुरूमुखातून मिळालेल्या आणि स्वतः रचलेल्या बंदिशींना स्वरलिपीबद्ध केले. त्या संग्रहाच्या आधारे सखोल अभ्यासानंतर थाटपद्धती मांडली. अनेक ग्रंथालयांतून उपलब्ध हस्तलिखितं स्वतः उतरवून काढून प्रसिद्ध केली आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली. आपला संगीतविचार अनेक लेखांतून शब्दबद्ध केला. संगीतशास्त्र इतरांनी स्वीकारायचे झाल्यास ते संस्कृत भाषेतून एखाद्या प्राचीन ग्रंथाप्रमाणे उपलब्ध व्हायला हवं, यासाठी त्यांनी 'श्रीमल्लक्ष्य संगीतम' हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. त्यानंतर काहीशा परकेपणाने त्यावर मराठीतून विस्तृत टीका लिहिली.
घराण्यांनी बराच काळ आपापल्या घराण्यातील गायकांपुरते मर्यादित ठेवलेले बंदिशींचे भांडार त्यांनी मुक्त केले. रागांचे स्वरूप गायकांना उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांनी रागलक्षणपर अनेक गीते लिहिली.
हिंदुस्थानी संगीत पद्धतीच्या क्रमिक मालिकेचे एकूण सहा भाग प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी १८९६ बंदिशी नोटेशनसह छापल्या. या साऱ्या बंदिशी त्यांनी देशभरातील उस्तादांकडून कशा मिळवल्या, याचा इतिहास रोमहर्षक आहे.
हे सारे खरे, पण एक महत्त्वाची त्रुटी होती. नोटेशननुसार गाणे गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय सहजी शक्य नव्हते. या बंदिशी उलगडायच्या कशा, हेही एक अवघड शास्त्र आहे. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे हे शक्य होऊ लागले. कलकत्त्याच्या संगीत रिसर्च अकॅडमीमध्ये या कामाला सुरुवात झाली. भातखंडे परंपरेतील श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे शिष्य पंडित कृष्णराव गिंडे आणि पंडित एस. सी. आर. भट या संगीताचार्यांनी बऱ्याचशा बंदिशी गाऊन ध्वनिमुद्रित केल्या. परंतु हे काम अपुरे राहिले होते. हे काम करताना त्यांना ज्या शिष्यांनी साहाय्य केले त्यात इंदुधर निरोडी हेही होते. व्यवसायाने ते लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये उच्च पदावर पोहोचले होते. तरी संगीत हा त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता. कर्नाटकमधील पुत्तुर या छोट्याशा गावात त्यांचा १९३५ साली जन्म झाला. बालपणातच उडिपी येथील गवई रावराव पित्रे यांच्याकडे त्यांनी प्राथमिक धडे घेतले. त्यावेळच्या पद्धतीनुसार त्यांचे कुटुंबही १९५१ साली मुंबईला आले. त्यांना विख्यात संवादिनीवादक गुरूदत्त हेबळेकर यांच्याकडे धडे गिरवता आले. त्यांच्यातील गायनकलेला आकाशवाणीच्या संगीत विभागाने सर्वश्रेष्ठ श्रेणी दिली आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनवर ते आपली कला सादर करत असतात. कर्नाटक सरकारने त्यांना 'गौरव प्रशस्ती' आणि 'संगीत विद्वान पुरस्कार' यांनी सन्मानित केले आहे.
इंदुधर हे संगीत क्षेत्रात नावाजले गेले, त्याहूनही त्यांच्यातील सद्गुणांनी. गुरूभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा हे आजकाल दुर्मीळ झालेले गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतात. त्यांचे गुरू पं. गिंडे आणि पं. भट कलकत्त्याला ध्वनिमुद्रणासाठी जाताना या शिष्यवराला घेऊन जात. पं. गिंडे हे कलकत्त्यातच अचानक निधन पावले आणि काही कारणांनी पं. भट यांनी पुढे चालू केलेले कामही अर्ध्यावर राहिले. हे काम पूर्ण करण्याच्या अतीव इच्छेने आणि श्रद्धेने पं. इंदुधर निरोडी यांनी हे बिकट काम स्वीकारले. जवळजवळ एकोणीसशे बंदिशी शिकून घेणे, साथीदारांची जमवाजमव करून त्या सर्व ध्वनिमुद्रित करणे, त्यांवर संस्कार करून त्यांच्या एमपीथ्री, सीडीज तयार करणे, सर्व बंदिशी शुद्ध करून मुद्रित स्वरूपात उपलब्ध करणे आणि हे सारे स्वतःच्या हिमतीवर, यासाठी अद्भुत श्रद्धा लागते. हे सारे काम त्यांनी स्वरसंकुल संगीत सभा या संस्थेच्या वतीने पार पाडले आणि अलीकडेच १५ मार्चला म्हैसूरला त्याचे विमोचन झाले.
पं. इंदुधर निरोडी यांचे अभिनंदन करण्यासाठी कर्नाटक संघ आणि म्युझिक फोरम या संस्थांनी दोन समारंभांचे आयोजन केले आहे. मंगळवार, १४ एप्रिल रोजी चव्हाण सेंटरच्या रंगस्वरमध्ये ६ वाजता पं. निरोडी यांचे भातखंडेरचित बंदिशींचे गायन आणि पं. सत्यशील देशपांडे यांचे 'भातखंडे आणि कुमार गंधर्व' या विषयावरील प्रात्यक्षिकांसह व्याख्यान होईल. तसेच, शनिवार, १८ एप्रिल रोजी माटुंग्याच्या कर्नाटक संघात पं. सुधींद्र भौमिक, भातखंडेंच्या बंदिशी सादर करतील आणि पं. निरोडी यांची मुलाखत पं. यशवंत महाले आणि पत्रकार विठ्ठल नाडकर्णी घेतील. सर्व संगीतप्रेमिकांसाठी ही दुहेरी पर्वणी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट