समीर मणियार
आम आदमी पार्टीच्या रूपाने महाराष्ट्रात काही आशा पल्लवीत होऊ लागल्या होत्या. पण दिल्लीचा स्वभाव आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज वेगळा असल्यामुळे आम आदमी पार्टीला चांगले यश मिळण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घ्यावी लागेल. तसे कष्ट घेण्यास कोणी तयार नाही. महाराष्ट्रात आम आदमी पार्टीत दाखल झालेली बहुतेक मंडळी ही परस्पर वैचारिक भूमिकेतील होती. दिल्लीतील फुटीचे लोण राज्यात येईल पण मोठी पडझड होणार नाही.
प्रस्थापित राजकीय पक्षांच्या राजकारणाला कंटाळून नवी दिल्लीतील मतदारांनी आम आदमी पार्टीच्या पारड्यात एकहाती सत्ता दिली. राजकारणात दोन वर्षे वयाच्या या पक्षाची ही कामगिरी लोकसभा निवडणुकीतील मोदीलाटेला शह देणारी असल्यामुळे त्या यशाचे मोल अधिक होते. परंतु यश डोक्यात गेले की काय होते हे आम आदमी पार्टीतील पहिल्या फळीतील अंतर्गत मतभेदामुळे लोकांसमोर आले. आपचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अजित झा आणि प्रा. आनंदकुमार यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हे करताना जो काही तमाशा झाला त्याचा उबग आल्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर पक्षातून तडकाफडकी बाहेर पडल्या. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या पक्षांतर्गत लोकपाल या पदावर असलेले महाराष्ट्रातील अॅडमिरल एल. रामदास यांनाही त्या पदावरून काढण्यात आले. आता महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीसुद्धा फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला होता. एकप्रकारे सामान्यांच्या लोकभावनेचा रोषच त्यातून व्यक्त झाला होता. अण्णा हजारे यांचे ते आंदोलन यशस्वी करण्यामागे पडद्यासमोर आणि पडद्यामागे अनेक लोकांचे कष्ट त्यावेळी कामाला आले होते. त्यात अरविंद केजरीवाल यांचा वाटा मोठा होता. कालांतराने त्याच आंदोलनाच्या भूमिकेला संसदीय निवडणुकीच्या राजकारणास जोडण्याची भूमिका अण्णा हजारे यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आम आदमी पार्टीच्या स्थापनेला व नंतरही पक्षाच्या पातळीवर पाठिंबा दिला नाही. आम आदमी पार्टीला जन्माला घालण्यात महाराष्ट्रातील खासकरून अण्णा हजारे व मंडळींचा काहीच वाटा नव्हता हे खरे आहे. पण समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात खासकरून वंचित समाजघटक आणि काही प्रश्नावर लढणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या मंडळींना सक्रिय राजकारणात उतरण्याची उर्मी आपच्या प्रयोगाला मिळाली होती.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत सायबरयुगातील नवी पिढीसुद्धा राजकीय व्यवस्था बदलाच्या या कामात उतरू पाहत होती. साहजिकच आणीबाणीनंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या उपद्रवमूल्य कमी झालेल्या समाजवादी चळवळीतील मंडळीना या प्रयोगाच्या निमित्ताने एक आशेचा किरण केजरीवाल यांच्या रूपात दिसायला लागला. हा वर्ग अण्णा हजारे यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराज असला तरी दिल्लीतील एनजीओच्या वर्तुळात एकेकाळी दबदबा असलेल्या केजरीवाल यांच्या प्रेमात पडू लागला. काँग्रेसमुक्त भारत करण्याचा आणि भाजपसारख्या उजव्या विचारांच्या शक्तीचा पाडाव करण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील युनिटमध्ये समाजवादी परिवारातील आणि विविध प्रश्नांवर आंदोलन करणारी मंडळी दाखल झाली. त्यात अनेकांनी लोकसभा उमेदवारी करून नशीब आजमावून बघितले होते. त्यात यश आले नाही हा भाग वेगळा. मात्र, दिल्ली विधानसभा निकालांनतर आपच्या महाराष्ट्रातील युनिटमध्ये मोठा उत्साह संचारला होता. पण विधानसभा निवडणुकीपासून पक्ष दूर राहिला. कारण विधानसभेपेक्षा दिल्लीत लक्ष्य केंद्रित करण्याचा केजरीवाल यांचा इरादा असल्याचे सांगण्यात येऊ लागले.
हरयाणा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यास योगेंद्र यादव गटाने पक्षाला भाग पाडले असा आरोप होत आहे. दिल्लीच्या विधानसभेत पक्षाचा पराभव करण्याचे कटकारस्थान शिजत होते असा विरोधी गटाचा आरोप आहे. असे असेल तर केजरीवाल यांचा दिल्लीत झालेल्या दणदणीत विजयाला भाजपच्या दिल्लीतील जुन्या नाराज मंडळींना मोठा हातभार लावला, असे म्हणता येते. भाजपमधील नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगळीच्या प्रभावाला शह देण्यासाठी दिल्लीतील जुन्या मातब्बर भाजप नेत्यांनी हातभार लावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज्यात आपच्या नेत्या श्रीमती अंजली दमानिया आणि मयंक गांधी यांच्या कार्यपद्धतीबाबत अधूनमधून मतभेदाचा सूर उमटत होता.
समाजवादी चळवळीसाठी समाजवादी विचारांच्या राजकीय पक्षाची गरज नाही. १९७७नंतर समाजवादी पक्ष विसर्जित झाल्यात जमा होता. निवडणुकीच्या राजकारणातील जुने मापदंड मोडीत निघाले. डाव्या पुरोगामी व समाजवादी मंडळींचे राजकीय उपद्रवमूल्य कमी कमी होत गेले. अशा विचारांच्या पक्षातील मंडळींना दुसऱ्या फळीकडे नेतृत्व देण्यात कुचराई केली. त्यामुळे नवी पिढी या मंडळीपासून दुरावली. यामुळे अनेकांचे आमदार खासदार होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अशांना आम आदमी पार्टीच्या रूपाने महाराष्ट्रात काही आशा पल्लवीत होऊ लागल्या होत्या. पण दिल्लीचा स्वभाव आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज म्हणा की जातकुळी वेगळी असल्यामुळे आम आदमी पार्टीला चांगले यश मिळण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घ्यावी लागेल. तसे कष्ट घेण्यास कोणी तयार नाही. महाराष्ट्रात आम आदमी पार्टीत दाखल झालेली बहुतेक मंडळी ही परस्पर वैचारिक भूमिकेतील होती. दिल्लीतील फुटीचे लोण राज्यात येईल पण मोठी पडझड होणार नाही.
योगेंद्र यादव यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना मानणारा वर्ग कमी असून, विरोधात बोलणारा वर्ग महाराष्ट्रात अधिक आहे. समाजवादी शब्दाचा त्याग करण्याची आपण तयारी ठेवायला पाहिजे असे वक्तव्य योगेंद्र यादव यांनी एका व्याख्यानात केले होते. याचाच अर्थ समाजवाद हा शिवी बनत असून, राजकारणात पर्याय देऊन निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आले पाहिजे असे यादव यांचे म्हणणे राज्यातील आम आदमीच्या अनेकांना मान्य नव्हते. या भांडणात केजरीवाल यांची सरशी होईल. राजकीय पक्षाच्या जीवनात असे चढउतार येत असतात. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या संघटनेला राजकीय ग्रहण लागले असे समजायचे कारण नाही असे राज्यातील काही नेतेमंडळी बोलत आहेत.केजरीवाल हे अण्णा हजारे यांना गुरू मानत असले तरी गुरुपेक्षा शिष्य वरचढ होता कामा नये, असे हजारेसमर्थकांना वाटते. तशात दिल्लीच्या निकालानंतर केजरीवाल यांचा लोकप्रियतेचा आलेख वाढत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अण्णांच्या मागण्यांची दखल घ्यायला तयार नाहीत. तसेच चर्चेलासुद्धा बोलावत नाहीत, ही हजारे यांची खंत आहे. आम आदमी पार्टीच्या जन्मात महाराष्ट्राचा सहभाग आहे. घराणेशाही, एकाधिकारशाही, व्यक्तिमाहात्म्य या अवगुणाची लागण आम आदमी पार्टीला होत असल्याचा आरोप होत असून, त्या आरोपाबाबत पक्षाला मानणाऱ्या लोकांमध्ये मतभेद आहेत. अशातच अण्णा हजारे यांनी सूचक मौन बाळगणे पसंत केले आहे. सध्यातरी योगेंद्र यादव यांच्यामागे महाराष्ट्र आपमधील नेते व कार्यकर्ते मंडळी मोठया प्रमाणात बाहेर पडतील, असे दिसत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट