जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात परत अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि हजार हेक्टरमधील पिके यात उध््वस्त झाली. आणि पाठोपाठ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. सातत्याने होत असलेल्या या अवकाळी पावसाने आज शेतकरी हतबल झाला आहे तर अवकाळी पावसापुढे महसूल विभागाने हार पत्करली आहे.
पावसाळा म्हटल्यावर 'चार महिने पावसाचे' असा अर्थ काढला जात होता. आता मात्र वर्षभर हा पाऊस धिंगाणा घालतांना दिसत आहे. एक ते दीड महिना अंतराने सातत्याने वर्षभरात तब्बल दहा वेळा या अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले असून कृषी अर्थव्यवस्था कोसळलेली दिसत आहे. विशेषत: जानेवारी ते मे या काळात गारपीट वादळीवाऱ्यांसह हा पाऊस होतांना दिसत आहे. तर अन्यवेळी वादळी पावसाचा प्रत्यय येत आहे त्यामुळे खरीपातील अखेरची पिके, रब्बीची पिके उध््वस्त झालेली आहेत. सातत्याने पडणारा अवकाळी पावसापुढे कृषी आणि महसूल विभागाने देखील हात टेकले आहेत. कारण पहिल्या अवकाळी पावसाचे पंचनामे करून त्याचा अहवाल होत नाही तोवर दुसरा अवकाळी पाऊस दारात हजर आहे. त्यामुळे सातत्याने केवळ या अवकाळी पावसाचे पंचनामे करणे आणि नुकसानीचा अहवाल तयार करून पाठवणे हेच काम सध्या सुरू असलेले दिसते.
गेल्या जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने १९३८ शेतकऱ्यांचे ९२६ हेक्टरमध्ये दीड कोटींचे नुकसान झाले होते पाठोपाठ फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या गारपीट, वादळी पावसाने एक लाख ६१ हजार शेतकऱ्यांचे १४३ कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर मेमध्ये चक्रीवादळाने ४७०० शेतकऱ्यांचे ६ कोटी ३१ लाखांचे तर जूनमध्ये ६४०० शेतकऱ्यांचे सात कोटींचे नुकसान झाले होते. हा नुकसानीचा सिलसिला डिसेंबरमध्ये देखील सुरूच होता. आतापर्यंत दोन लाख ५२ हजार शेतकरी या अवकाळी पावसाच्या फटक्याने बाधीत झाले असून १७० कोटींवर नुकसान केलेले आहे. राज्य शसनाने यांना मदतीचा हात देवू केलेला असून १२८ कोटींचे अनुदान आले असून याचे वाटप झालेले आहे. आता परत २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून आता या पावसाला शेतकरीच कंटाळलेले दिसतात. शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत २०१४ मध्ये १६६ शेतकऱ्यांनी तर २०१५ मध्ये आता पर्यंत २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अवकाळी पावसाने हतबलता आल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून या आत्महत्या रोखायच्या कशा, शेतकऱ्यांची मानसिकता बदलायची कशी हा सवाल आज जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला असून प्रशासनाने मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा सुरू केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट