बहुभाषिक संमेलन असल्यानं मराठीसह हिंदी, उर्दू, तेलुगु, छत्तीसगढी कवी, शाहिरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून संघर्षाचे स्थानिक मुद्दे, गोरगरिबांच्या वेदना मांडल्या. विविध धर्मांमध्ये वाढत असलेली कट्टरता हा सध्या मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ज्येष्ठ उर्दू कथाकार जहीर अली यांनी उर्दू साहित्यात असलेला पुरोगामी परंपरेचा इतिहास मांडला. 'प्रोग्रेसिव्ह रायटर्स मुव्हमेंट', 'इप्टा'सारख्या चळवळीतून उर्दूत अनेक पुरोगामी लेखक कवी, शायर पुढे आले. त्यांनी समाजात मोठं जनजागृतीचं काम केल्याचे दाखले त्यांनी दिले. फाळणी हा या परंपरेला मोठा धक्का असल्याचं ते म्हणाले. एकोणिसाव्या शतकात उर्दू भाषेत इंद्रधनुष्यासारख्या रचना लिहिणारे शायर म्हणून गालिब आपल्याला परिचित आहे. परंतु गालिब हा उर्दूतला पहिला बंडखोर कवी होता, त्यांच्या बंडखोर रचनांनी अनेकांना प्रेरणा दिल्याचा इतिहास जहीर अली यांनी जागवला.
सामाजिक अभ्यासक राम पुनियानी यांनी धर्मांधतेची चिकित्सा करून, त्याचा चहुबाजूंनी होत असलेला हल्ला निदर्शनास आणून दिला आणि या हल्ल्याला थोपविण्यासाठी गांधीजींचा मार्ग अवलंबिण्याची गरज विषद केली. पुरोगामी चळवळीच्या विविध छटांमध्ये गांधींविषयी असलेल्या मतभेदांच्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन गांधी नेमके काय आहेत, ते समजून घेण्याची गरज कधी नव्हे तेवढी आज आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी हाच मुद्दा आपल्या भाषणात पुढे नेला. प्रागतिक चळवळीतील विविध धारांमध्ये साहचर्याची भावना असली, तरी सुसंगती दिसून येत नाही. एकमेकांविषयी आस्था असली, तरी परमताविषयी आदर असेलच असं नाही. त्यामुळे रेषेच्या अलीकडे असलेल्यांमध्ये सुसंवाद, मैत्री आणि विश्वास गरजेचा असल्याचं मत त्यांनी मांडलं. या परिसरातून आलेल्या तरुणांची मोठी उपस्थिती हे या संमेलनाचं वैशिष्ट्य मानता येईल. एखाद्या संमेलनात श्रोते आणि वक्ते यांच्यात समन्वय, कनेक्ट असतोच असं नाही. परंतु इथे आलेले श्रोते एकप्रकारे वैचारिक भूक घेऊन आलेले दिसत होते. विविध परिसंवादात श्रोत्यांच्या सक्रिय सहभागातून आपली वैचारिक भूक भागविण्याची धडपड दिसून आली. इतर संमेलनं आणि या संमेलनात हा गुणात्मक फरक प्रकर्षाने जाणवला.
- रसिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट