सद्यस्थितीत मुंबईतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलांतील अतिदक्षता विभागांमध्ये युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन, न्यूमोनिया, अन्यर प्रकारचे फेफ्सीस आदी संसर्गांमुळे दाखल होणारे काही पेशंट कोणत्याही अँटिबायोटिक्सला प्रतिसाद देत नाहीत, असे अनेकदा आढळते. अशा पेशंटना वाचविण्यासाठी डॉक्टरांना खूप कसरत करावी लागते. काही वेळा हे सर्व उपचार करूनही पेशंट दगावतात. म्हणूनच अँटिबायोटिक्सच्या वापराविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) यांना अँटिबॅक्टेरियल्स असेही म्हणतात. शरीरात जीवाणूंच्या प्रसारामुळे नुकसान होत असेल, तरच ही ओषधे दिली जातात. अँटी हा युनानी वा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ विरोध. बायोस म्हणजे जीवन. अँटिबायोटिक्स म्हणजे, जीवनविरोधी बॅक्टेरियाशी लढणारे औषध.
अँटिबायोटिक्सचा वापर शरीराला अपायकारक जीवाणूंशी लढण्यासाठी केला जातो. टीबी आणि इतर प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. मेंदूज्वरासारख्या भयंकर रोगांचे कारण बॅक्टेरियाच असतात. काही बॅक्टेरिया घातक, तर काही लाभदायक असतात.
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, अँटिबायोटिक्स औषधे बॅक्टेरियाशी लढतात. त्यांचा योग्य वापर केला, तर ती जीवनरक्षक औषधे आहेत. या औषधांमुळे बॅक्टेरियाच्या प्रसारास प्रतिबंध होतो, त्यांचा खात्मा होतो. मुळात मानवी शरीरातील नैसर्गिक प्रतिकारक्षमता अशा बॅक्टेरियांशी लढा देत असते. बॅक्टेरियाच्या शरीरातील वाढीला रोगांचा संचार होण्यापूर्वीच प्रतिबंध करण्याची नैसर्गिक क्षमता प्रत्येक व्यक्तीत असते. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतात. मात्र, त्यानंतरही संसर्ग झाला, तर अँटिबायोटिक्स घ्यावे लागतात.
पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक आहे. याच्याशी संबंधित अँम्पिसिलीन, अॅमॉक्सिलीन व बेंजिलपेनिसिलीन ही अँटिबायोटिक्स आहेत. याचा वापर सध्या अधिक प्रमाणात होत आहे. याशिवाय इतर अनेक प्रतिजैविके आहेत. अनेक देशांतील डॉक्टर्स ही औषधे घेण्याचा सल्ला देतात.
अतिवापर केल्यास
सुमारे दशकभरापूर्वी डोंबिवली शहरात टायफॉइडचे अनेक पेशंट (डोंबिवली फिव्हर) आढळले होते, ज्यांचा टायफॉइड कोणत्याही औषधांना प्रतिसाद देत नव्हता. त्यावेळी प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, हे प्रकाशझोतात आले होते. याचप्रकारे सेरेब्रल मलेरियाचे काही पेशंट आढळतात, जे रोजच्या वापरातील मलेरियाच्या औषधांना प्रतिसाद देत नाहीत व परिणामी पेशंट दगावतात. मल्टि ड्रग रेझिस्टन्स ट्यूबरक्युलोसिसचे (एमडीआर) उदाहरणही आपल्यासमोर आहे. यामुळे डॉक्टरही दगावल्याच्या घटना आपल्यासमोर आहेत. सध्या जगभरात प्रतिजैविकांचा अतिवापर ही प्रमुख समस्या आहे. अतिवापराने बॅक्टेरिया या औषधांवर मात करू शकतात. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनेही प्रतिजैविकांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यानुसार प्रतिजैविके बॅक्टेरियावर प्रभावी ठरत नसल्याने दरवर्षी २५,००० लोकांचा मृत्यू होत आहे. अँटिबायोटिक्सच्या वापराचे पुरेसे ज्ञान नसेल, तर त्याचा अतिवापर करणे हे शरीरातील पोषक मायक्रोब्स वा बॅक्टेरियांच्या नायनाटास कारणीभूतठरू शकते. म्हणजेच, प्रतिजैविके जितकी चांगली तितकी दुष्परिणामजनकही आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट