ब्रेन अॅण्ड स्पाइन तज्ज्ञ
गेल्या दशकात जगभरात ऑटिझमच्या प्रमाणात कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत १९८९मध्ये दहा हजार अपत्यांमागे चार ऑटिझमग्रस्त असे प्रमाण होते. पण, सन २०००मध्ये हेच प्रमाण दहा हजार अपत्यांमागे ७६ इतके इतके वाढले. सध्या हे प्रमाण दहा हजार अपत्यांच्या मागे ६८ असे आहे. भारतात २५० अपत्यांमागे एक अपत्य असे हे प्रमाण आहे. अजूनही अनेकांना या विकाराची पूर्ण माहिती नाही. या लेखात आपण ऑटिझमविषयी माहिती घेऊया.
ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसकि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
खरे तर, ऑटिझमचे कोणतेही एक कारण नाही. मुलाच्या मेंदूतील रचनात्मक आणि कार्यात्मक विकासासमुळे झालेल्या हानीमुळे ऑटिझम होतो, असे मुख्यत्वेकरून मानण्यात येते. संशोधकांनी ऑटिझम होण्याची काही कारणेही शोधून काढली आहेत. जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली व तणावाचे प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरू शकते. गरोदरपणाच्या काळात काही औषधांचे सेवन हेही ऑटिझमच्या कारणांपैकी एक कारण असू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सतत ताप येत असेल, अचानक फ्लूची लागण होत असेल तर किंवा कुठलेही अँटिबायोटिक्स घेण्यापूर्वी सल्ला घ्यावा, असे डॉक्टर सांगतात. वातावरणात असलेल्या टेराटोजेन्स आणि पाऱ्याच्या प्रमाणामुळेही अपत्याला जन्मजात ऑटिझमचा विकार असू शकतो. अशा अपत्यांची लक्षणे व काय करता येईल त्याची माहिती पुढील लेखात घेऊया.
-डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन