तुम्ही गिर्यारोहणाकडे वळलात, तेव्हा गिर्यारोहणासाठी पैसा उपलब्ध होता का?
मी सुरुवातीस अर्धवेळ अध्यापन वगैरे करून या क्षेत्रात पाय रोवले. मोहिमांसाठी पैशांची नेहमीच चणचण असायची. पण, ब्रिटनमध्ये १९८०च्या दशकात या खेळासाठी कॉर्पोरेट स्पॉन्सरशीप मिळत होती. पैसा होता. तेव्हाही मोहिमेवर जाईपर्यंत सगळीकडे आमच्या मुलाखती वगैरे यायच्या. नंतर आम्ही शिखर सर केले का, आमचे नेमके काय झाले, याचे फारसे कुणाला काही पडलेले नव्हते. नव्वदीनंतर तिथेही पैशाचा ओघ आटलाच. जगभर तशीच स्थिती राहिली, कारण इतर खेळांसारखा हा प्रकार 'प्रेक्षणीय' नाही.
तुम्ही एव्हरेस्ट सर केलेत का?
छे! एव्हरेस्टने मला कधीच खुणावले नाही. एकतर माझ्या खास ब्रिटिश स्वभावानुसार मी दरवेळी नव्या अपरिचित मार्गावर शोधयात्रा करण्याच्याच प्रेमात असतो. नवेपणातच मला आव्हान दिसते. यूआयएए या शिखर संस्थेने नव्वदीमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसारही सर्वाधिक फर्स्ट अॅसेन्ट्स (पहिले अजिंक्य आरोहण) ब्रिटिशांनी केले होते व त्यानंतर जपानचा क्रमांक होता, असे आढळले. आमच्या ते रक्तातच असावे. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आरोहण मला नेहमीच खुणावते. आल्प्सची उंची ४,८०० मीटरच असली, तरी तेथील आरोहण कठीण आहे, ते त्यामुळे. अर्थात तुम्हाला काही पर्वतांचा असा अतिलोकप्रियतेमुळे बळी द्यावा लागतो.
तुम्हाला आजवरचे सर्वात कठीण आव्हान कुठले होते?
असे काठिण्याचे ग्रेडिंग करणे हीच मुळात अवघड गोष्ट आहे. तरीही काही उदाहरणे द्यायची, तर अंटार्क्टिकातील एका मोहिमेचा दाखला देता येईल. तिथे थंडी फार नव्हती. परंतु, बर्फ भरपूर होता आणि सोसाट्याचे वारे होते. समुद्रसपाटीवर ग्लेशियर होते. आरोहणासाठी फार उंची गाठायची नव्हती. परंतु, २८ दिवसांत आम्हाला तीन दिवसच दृश्यमान हवेचे मिळाले आणि तेवढ्या काळात हजार मीटर्सचे आरोहण करायचे होते. हे खूप मोठे आव्हान होते. अल्पाइन पद्धतीच्या आरोहणात छावण्या, वगैरे न लावता सलग आरोहण केले जाते व त्यामुळेही त्यात आव्हाने असतात. दोन स्पॅनिश गिर्यारोहकांनी १९८५मध्ये केलेली अन्नपूर्णा मोहीम आव्हानात्मक होती.
तुम्ही असे बरेच डॉक्युमेन्टेशन करता... गिर्यारोहण मोहिमांचे अचूक वृत्तांत लिहिले जातात का?
आजकाल ब्लॉग, वर्णने सगळेच भाराभर लिहितात. परंतु, अचूकता त्यात नसते. बरेच अहवाल हे प्रेस रिलीजसारखे आणि रद्दीलायक असतात. तुम्ही नेमके कसे गेलात, कुठे पोहोचलात, याचे मार्गदर्शनच त्यात नसते. काही देशांचे आरोहक भाषेच्या समस्येमुळे दिशा, वगैरे बाबतीत घोळ घालून ठेवतात. पण प्रत्येक देशाची करन्सी जिथे वेगळी असते, तिथे गिर्यारोहणात सामाईक ग्रेडिंग तरी कसे होणार? स्पॉन्सरशीपसाठी यश सिध्द करण्याच्या दबावातून काही गिर्यारोहकांनी शिखर सर केल्याचे खोटे दावेही केले आहेत. जगातील अत्युच्च उंचीवरील २१ शिखरे सर करण्यास निघालेल्या एका ऑस्ट्रियन गिर्यारोहकाचा के २च्या बाबतीतील दावा असा शंकास्पद निघाला. नंतर त्याने स्वतःच खोटारडेपणा केल्याची कबुली दिली.
आमच्याकडे सध्या सरकार सुरक्षेचे नियम बनवत आहे, तसे करावे का?
इथले संदर्भ मला माहित नाहीत. परंतु, युरोपात कुणी गाइड किंवा इन्स्ट्रक्टर बनला असेल, तर त्याला पात्रता असावीच लागते. ब्रिटनमध्ये तसे नाही. परंतु, सरकारने शक्यतो या खेळास प्रोत्साहन द्यायला सुविधा, पैसा पुरवावा. या क्षेत्रातील धुरिणांच्या हातीच त्याचे सेल्फ-पोलिसिंग सोपवावे. नोकरशाहीने गिर्यारोहणावर हुकुमत गाजवली, तर त्यासारखे धोकादायक काही नाही. चांगल्या व अस्पर्धात्मक खेळांना पैसा मिळत नाही, हे सगळीकडेच आहे.
मुलाखतः समीर कर्वे
येथे क्लिक करुन जाणून घ्या मुंबईत होणा-या हिमालयन क्लबच्या सेमिनारबद्दल
आल्प्स पर्वतराजीत वयाच्या १८व्या वर्षी गिर्यारोहण सुरू केलेले ब्रिटिश गिर्यारोहक लिंडसे ग्रिफीन यांनी जगभरातील ६०हून अधिक शिखरांवर पहिले आरोहण केले आहे. दुर्गम व नवे मार्ग धुंडाळणे ही त्यांची जिद्द. मात्र, अजूनही एव्हरेस्टने आपल्याला खुणावले नसल्याचे ते सांगतात. हिमालयन क्लबच्या सेमिनार निमित्त मुंबईत आलेल्या ग्रिफिन यांच्याशी केलेली बातचीत.