वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल एक हजार रिक्षाचालकांवर पोलिसांनी एकाच दिवसात कारवाई केली आणि आपसूक वादाला तोंड फुटले. शिरस्त्यानुसार, रिक्षा चालकांनी प्रत्युत्तर देत कारवाई थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. आतापर्यंत चालत आलेला गोंधळ असाच पुढे चालू ठेवायचा की, त्यामध्ये खरोखरच काही आमूलाग्र बदल घडवायचा, हा निर्णय आता प्रवाशांना घ्यावा लागेल. एका विधेयकाच्या मुद्द्यावरून सर्वसामान्यांनी पुकारलेला लढा देशव्यापी होऊन सत्तेचे तख्त पालटू शकते.. मग ठाण्यातली रिक्षा व्यवस्था का नाही सुधारणार?
......
दिव्यात दोन जानेवारीला लोकल प्रवाशांचा उद्रेक झाला तेव्हा हतबल रेल्वे प्रवाशांना नाडण्यात रिक्षाचालकांनी धन्यता मानली. कल्याण ते ठाणे प्रवासासाठी चक्क दोन हजार रुपये आणि कल्याण- बदलापूरपर्यंत हजारांहून अधिक भाडे उकळले गेले. त्या कठीण समयी, प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी एकाही नेत्याने का पुढाकार घेतला नाही, असा सवाल करत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच रिक्षा संघटनांच्या नेत्यांचा दांभिकपणा उघड केला. दुसरीकडे, ठाण्यातील स्वप्नाली लाड या इंजिनीअर तरुणीने ज्या रिक्षेतून उडी मारली, तो रिक्षाचालक इतक्या महिन्यानंतरही सापडत नाही. अशा अनेक घटनांमुळे रिक्षाचालकांची सर्वसामान्यांमधील प्रतिमा अधिकच डागाळत आहे.
मुंबईकरांना उपनगरी सेवेला बेस्टचा आणि आता मोनो, मेट्रो असे अनेक सक्षम पर्याय आहेत. पण ठाणे जिल्ह्यातला सुमारे ५० लाख प्रवाशांपुढे कोणताच पर्याय नाही. त्यामुळे त्यांना केवळ रिक्षा व खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. गेल्या दोन दशकांत रिक्षाप्रवाशांची संख्या कित्येक पटींनी वाढत असताना, रिक्षा मात्र तितक्याच राहिल्या. नवे परमिट दिले जात नाहीत आणि दुसरीकडे कोणी कारवाईच करत नसल्याने अनधिकृत रिक्षा फोफावल्या. आता तर अधिकृत रिक्षांपेक्षा अनधिकृत रिक्षांची संख्याच जास्त असतील, असे बोलले जाते.
तरीदेखील ही यंत्रणा कमीच पडते. त्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि याचाच पूरेपुर गैरफायदा रिक्षाचालकांनी उचलला आहे. पूर्वी गावे छोटी असल्याने रिक्षाचालक व प्रवासी यांचा एकमेकांशी परिचय असायचा. पण गेल्या दोन दशकांत शहरांचा सातत्याने होत असलेला विस्तार आणि पर्यायाने मागणीत होणारी वाढ यांमुळे परप्रांतातील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात ठाणे, कल्याणात दाखल झाले. त्यांचा स्थानिकांशी परिचय नाही, इथल्या मातीशी नाळ जुळलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाडण्यात त्यांना गैर काहीही वाटत नाही. त्याउलट त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेणे हे ते आपले कर्तव्य समजतात. त्याचाही नकारात्मक परिणाम रिक्षाचालकांच्या प्रतिमेवर होत आहे. रिक्षाचालक म्हणजे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे.. कुटुंबाचा सदस्य ही प्रतिमा केव्हा पुसली गेली आणि रिक्षाचालक म्हणजे मुजोर हे विशेषण चिटकले.
नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिस व आरटीओ यांची. वाहतूक पोलिस किमान रस्त्यावर दिसतात. ते नियमन करताना दिसले म्हणजे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर ते कारवाई करत असतातच, अशी भाबडी समजूत करून घेण्याचे कारण नाही. पण वाहतूक पोलिसांना दंडाचे अधिकार अत्यंत मर्यादीत आहेत. त्यामुळे आरटीओचा जो धाक रिक्षाचालकांना वाटतो, तितका वाहतूक पोलिसांचा वाटत नाही. पण आरटीओ अधिकारी नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करत आहेत, असे ठोसपणे ठाण्यात दिसतच नाही. केवळ नव्या वाहनांची नोंदणी आणि जुन्यांचे हस्तांतरण इतक्यापुरताच हा विभाग मर्यादीत राहिलेला आहे. साहजिकच ही निष्क्रीयता रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडतेय.
रिक्षाचालक भाडे नाकारतात, मीटरप्रमाणे प्रवासी नेत नाहीत, गणवेश घालत नाहीत आणि ओव्हरसीट वाहतूक हाच जणू नियम असल्यासारखे वागतात, पेट्रोल रिक्षा सीएनजीच्या दराने भाडे वसुल करतात.. या सगळ्या बाबी केवळ परवाच्या कारवाईच्या वेळी दिसल्या असे नाही, तर रोज असतात. पण कारवाई होणारच नाही हे माहीत असल्याने ते बिनदिक्कत नियम मोडतात. त्यांना रिक्षा संघटनांचे नेते कधी शिस्तीचे धडे देत नाहीत. या नेत्यांची शक्ती केवळ आपले नेतेपद टिकवण्यात खर्ची पडते. ते कधी प्रवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता प्रवाशांनीच या अप्पलपोट्या नेत्यांची दुकानदारी बंद पाडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
पोलिसांच्या कारवाईला विरोध होतो, त्याचीही कारणे आहेत. एकाच दिवशी हजार रिक्षांवर कारवाई करण्याऐवजी वर्षभर दररोज नियम मोडणाऱ्या पन्नास रिक्षाचालकांवर कारवाई होऊ शकत नाही का? त्यामध्ये सातत्य दिसले की, आपसूक बेशिस्त चालक वठणीवर येतील. पोलिसांना वरिष्ठांनी टार्गेट देऊन कारवाईस भाग पाडल्याची टीका होते ती अचानक होणाऱ्या कारवाईमुळे. हे वरिष्ठांनीही लक्षात घ्यायला हवे.
सगळेच रिक्षाचालक नियम मोडणारे आहेत, असे नाही. गेल्या ३६ वर्षांत एकदाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे न लागलेले आणि शेकडो प्रवाशांशी जीवाभावाचे संबंध असलेले विनय नाफडे यांच्यासारखे असंख्य रिक्षाचालक प्रत्येक शहरांत आहेत. अशा रिक्षाचालकांनी आता जनतेच्या लढाईमध्ये त्यांना उघडपणे साथ देण्याची गरज आहे. तरच रिक्षाचालकांची प्रतिमा भविष्यात उजळेल. प्रवाशांनी आता तरी संघटीत होऊन वाहतूक पोलिसांच्या कारवाईला साथ देण्याची गरज आहे. त्यासाठी कोणतेही मोर्चे काढण्याची किंवा झेंडे फडकवण्याची गरज नाही. नियमाप्रमाणे वाहन चालवणाऱ्याच्या रिक्षेतूनच मी प्रवास करेन, इतकाच निर्धार केला तर पोलिसांचीही गरज भासणार नाही, हे निश्चित.
>> आशिष पाठक