Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

साहित्य, मृत्युदंड नि सापेक्षता..

$
0
0


फाशी. या दोन अक्षरांभोवती भारतीय मानस कायम अस्वस्थ घुटमळत राहिले आहे. खरे तर संवेदनशील आहे. गुन्हेगारी कृत्याची ती सर्वोच्च सजा असल्याची भावना त्याभोवती असल्यामुळे असेल, परंतु मुळातच गुन्हा, गुन्ह्याची व्याख्या, त्याची व्याप्ती, त्यामागील कारणमीमांसा, गुन्हेगार आणि निरपराध यांची विभागणी करणारी व्यवस्था व जीवनमूल्ये याबाबत आपल्याकडे फारसे खोलात जाऊन चिंतन, लेखन अथवा उच्चारणही झालेले नाही. समोरच्या ढोबळ वास्तवाला सापेक्ष आणि भिन्न पदर असतात. सजा देण्याचा अधिकार एकवटलेल्या यंत्रणा आणि फाशी हीच अंतिम आणि न्याय्य सजा असल्याचे मानणारी बहुसंख्या यांच्या प्रभावाखालील न्यायदानावर या पदरांचा झाकोळ येऊ शकतो. मात्र दुसरी, तिसरी किंवा अन्य कोणतीही बाजू गृहीत न धरण्याच्या परंपरेचा पगडा असल्यामुळे 'असा झाकोळ येऊ शकतो' याकडे लक्ष वेधणाऱ्या व्यक्ती ​वा विचारांकडे या यंत्रणा व बहुसंख्य लोक दुर्लक्ष तरी करतात, किंवा हा विचारच निंदनीय ठरवतात.

भारतीय साहित्यातही मराठीमध्ये विजय तेंडुलकर किंवा कन्नडमध्ये यू. आर. अनंतमूर्ती यासारखे सर्जनशील लेखक वगळता 'फाशी'चा वेगळ्या अंगाने फारसा विचार झालेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर 'लिटररी एक्झिक्युशन्सः कॅपिटल पनिशमेंट अँड अमेरिकन कल्चर, १८२०-१९२५' हे जॉन सिरील बार्टन यांचे पुस्तक वेगळ्या विचारविश्वात नेणारे आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील अमेरिकन साहित्यात फाशीचे प्रतिबिंब कसे उमटले आहे याचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात अमेरिकन समाजात मृत्यूदंडाबाबत गेले सुमारे २०० वर्षे चाललेल्या विचारमंथनाचा, विविध विचार‍/मतांचा आणि फाशीविरोधी तसेच फाशीसमर्थक चळवळींचा आलेख उलगडत जातो. विशेषतः‍ एकोणिसाव्या शतकातील साहित्यात मृत्यूदंडाचे अनेक संदर्भ आहेत आणि हे 'अ युनिकली अमेरिकन काँट्रिब्युशन टू वर्ल्ड लिटरेचर' असल्याचे लेखक अभिमानाने नमूद करताना दिसतो. 'कॅपिटल पनिशमेंट क्लेम्स टू बी बोथ अ लॉ ऑफ द पीपल अँड अ लॉ अबव्ह देम' असे प्रतिपादन करणाऱ्या देरिदाचा उल्लेख बार्टन यांच्या लेखनात वारंवार येतो. बहुसंख्य नागरिकांच्या संमतीची ढाल पुढे करत व्यक्तीच्या नियंत्रणापलीकडे असणाऱ्या यंत्रणा या मृत्यूदंड हा एखाद्याला ठार करण्याचा निरंकुश अधिकार म्हणून वापरतात तेव्हा स्व-नियंत्रणाची जबाबदारी आणि सार्वभौमता यांच्यात तणाव निर्माण होतो या दृष्टिकोनातून लेखक या सजेकडे पाहतो.

लेखकाची स्वतःची अशी एक भूमिका असली, तरी अमेरिकन साहित्याचा आढावा घेताना त्याने फाशीविरोधात सातत्याने मांडणी​ करणाऱ्या लेखकांच्या बरोबरीने फाशी हाच नैसर्गिक न्याय असल्याचे मांडणाऱ्या लेखकांच्या साहित्याचीही नोंद घेतली आहे. फाशीसमर्थक लेखकांसंदर्भात त्याची निरीक्षणे इंटरेस्टींग आहेत. लेखक म्हणतो, की हे साहित्यिक गुन्हेगार पात्रे, हिंसेची वर्णने, भावनिक आवेग यांचे असे काही चित्रण करतात, की संबंधित पात्राला मृत्यूदंडच दिला गेला पाहिजे या बाजूने प्रथमपासूनच वाचकांचे मन तयार होत जाते व प्रत्यक्ष फाशीची घटना वाचताना त्यांना अन्य कोणत्याही बाबी महत्वाच्या वाटत नाहीत. दुसरीकडे बार्टन असेही मांडतात, की फाशीविरोधी साहित्यिकही आपली बाजू प्रभावी मांडतात, मात्र ते परस्परांशी सहजी जोडले जात नाहीत.

राजकीय मतभिन्नता, राजसत्तेविरोधातील उठाव, अभिव्यक्तीमधले धोके, भिन्नमताबाबतची असहिष्णुता, विशिष्ट सामा​जिक-राजकीय परिस्थितीतील व्यक्तींची अथवा समूहांची कृत्ये व त्यामागील मानसिकता, समाजातील परपंरागत समजुतींना आव्हान देणाऱ्या व्यक्ती‍/संस्थांबाबतची बहुसंख्यांची नकारात्मक वृत्ती, गुन्ह्याला प्रवृत्त करणारी कारणपरंपरा व त्याची मीमांसा हे अतिशय महत्वाचे मुद्दे बार्टन मांडतात. जनतेच्या भावना आणि राजसत्तेच्या वारसदारांची सार्वभौमता यांच्यातील ताण हा बऱ्याचदा बहुसंख्यांना 'न्याय' देऊन कसा संपवला जातो आणि त्यातून आणखी नवे ताण कसे निर्माण होतात त्याबद्दलही यात भाष्य आहे. आपल्याकडची अफझल गुरूची फाशी हे त्याचे उदाहरण ठरू शकते. अफझलच्या फाशीबाबात संवेदनशील असलेले बहुसंख्याक समाजमन आणि या फाशीने केलेला दहशतवादी मानसिकतेचा गुणाकार याचा वेध घेणारे लेखन निश्चितच भारतीय विचारविश्वात भर घालणारे ठरेल. मात्र या विषयाला केंद्रस्थानी ठेवण्यास आपले लेखनविश्व फारसे तयार नाही आणि दुसरे म्हणजे बार्टन म्हणतात तसे जे विचारवंत‍/लेखक याकडे वेगळ्या अंगाने पाहू मागतात, ते परस्परांशी जोडले जाण्यासारखे वातावरणही नाही.

- प्रतिमा जोशी

'लिटररी एक्झिक्युशन्सः कॅपिटल पनिशमेंट अँड अमेरिकन कल्चर, १८२०-१९२५', लेः जॉन सिरील बार्टन, प्रकाशकः जॉन्स हॉपकिन्स,

पानेः ३६८


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>